Sunday, April 15, 2018

डिझायनिंग क्षेत्रातील करियर


मुळात कलेचे क्षेत्र करियर साठी निवडले पाहिजे हा समज  भारतीय समाजात तितका रुजलेला नाही. त्यातून अॅनिमेशन, वेब डिझायनिंग, व्हीएफएक्स, ग्राफिक्स वा इंटेरिअर डिझाईन  म्हणजे नवे काही तरी आहे त्याला पारंपारिक कलेची स्पर्धा आहेच ना. पारंपारिक कलेच्या क्षेत्रात काम करणार्यांना अॅनिमेशन या क्षेत्राची महतीच मान्य नसते. त्यामुळे या क्षेत्राकडे अनेक जन संधी असूनही पाठ फिरवतात. असे जरी असले तरी या क्षेत्राची होत असलेली वाढ पाहता या क्षेत्रात नक्कीच करियर अधिक खात्रीशीर असते असे म्हणायला हरकत नाही.
अॅनिमेशन : अॅनिमेशन म्हटले कि आपल्याला जरी केवळ कार्टून चित्रपट आणि जाहिराती आठवत असले तरी संगणकाच्या युगात ते संपूर्ण सत्य नाही. संगणकाच्या युगात अॅनिमेशनच्या कक्षा प्रचंड रुंदावलेल्या आहेत. आज अॅनिमेशन हि संकल्पना प्रत्येक उद्योग जगताची निकड बनली आहे. संगणकाच्या या युगात विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य शास्त्र, वाहन उद्योग, स्थापत्य अश्या सर्वच उद्योगामध्ये अॅनिमेशनला दुसरा पर्याय नाही. या सर्वच क्षेत्रांना आपल्या आपल्या सादरीकरणासाठी अॅनिमेशन गरज लागत आहे.
टॉम-जेरी, मिकी माउस पासून सिंदबाद पर्यत, अलिफ लैला मधील सिकंदर पासून नार्निया मधील अझलन पर्यंत वा कुन्फू पांडा मधील मार्शल आर्ट करणारा पांडा पासून फायन्डींग निमो मधील निमो पर्यत या सर्वांचीच एक वेगळीच भुरळ प्रत्येकालाच पडलेली आहे. हि यादी खरेतर खूप मोठी आहे आणि ती मोठी असून देखील यातील प्रत्येकच प्रत्येकाचा आवडता आहे. भाषा, प्रांत अश्या सर्वच मर्यादा ओलांडत हे सगळी पात्रे आपल्या पर्यंत पोहचली आहेत.  ती जणू आपल्यातलीच आहेत इतका त्यांच्याविषयी जिव्हाळा आपल्याला वाटतो. हिच जादू आहे अॅनिमेशन नावाच्या कलात्मक  विश्वाची.
अॅनिमेशन म्हणजे काय? या प्रश्नाला अनेक प्रकारे उत्तरे देता येतील. एका वाक्यात याचे उत्तर अशक्यच आहे पण जगात जे काही शक्य अशक्य आहे ते सर्व काही सादर करण्याचे माध्यम म्हणजे अॅनिमेशन. या अॅनिमेशन चे क्लासिकल किंवा ट्रडिशनल अनिमेशन, टू डी अॅनिमेशन, थ्री डी अॅनिमेशन, मोशन ग्राफिक्स, स्टोप मोशन अॅनिमेशन असे मुख्य प्रकार आहेत. याशिवाय इतरही काही प्रकार आहेत परंतु आपण करीयरच्या अंगाने अॅनिमेशन  या विषयाकडे पाहत असल्याने त्याच विषयांवर चर्चा करूयात. अॅनिमेशन उद्योगाची व्याख्याच ज्यामुळे बदलली ते अॅनिमेशन म्हणजे टू डी आणि थ्री डी अॅनिमेशन. जे अॅनिमेशन कालपर्यंत केवळ एक कला होते ते आता संगणकामुळे तंत्रज्ञान बनले. संगणकावर केल्या जाणाऱ्या टू डी म्हणजेच टू डी अॅनिमेशन ला आपण वेक्टर प्रकारात धरू शकतो. सादरीकरण करण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे. काही संगणक प्रोग्रमचा वापर करून या प्रकारचे अॅनिमेशन तयार केले जाते. इथे फक्त स्टोरी बोर्डिंग पर्यंत चित्रकलेचा संबध असतो नंतर पूर्ण तंत्र वापरायचे असते. जे टू डी अॅनिमेशनचे तेच थ्री डी अॅनिमेशन चे. हे आधुनिक असे कलात्मक तंत्र जगातल्या प्रत्येक उद्योगात वापरले जात आहे. डिजिटल हि संकल्पना यामुळेच शक्य बनली आहे. अॅनिमेशनचा उपयोग येणाऱ्या काळात नव्या नव्या क्षेत्रातही केला जाणार असल्याने या क्षेत्रात सतत मनुष्यबळाची कमतरता भासत राहणार असल्याने रोजगाराच्या हमखास संधी उपलब्ध होत राहणारा आहेत.

पोस्ट प्रोडक्शन - व्हिज्युअल इफेक्ट्स  : हॉलीवूडचा कोणताही चित्रपट असो – हॅरी पोटर पासून नार्निया पर्यंत, जुरासिक वर्ल्ड पासून ३०० पर्यत वा भारतीय चित्रपट उद्योगातील रावण पासून रोबोट असो कि बाहुबली या सर्व चित्रपटांची भव्यता हि केवळ व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे. आजच्या मनोरंजनाच्या जगात या तंत्रज्ञानाला दुसरा पर्याय नाही. अगदी दहा सेकंदाच्या जाहिराती पासून पूर्ण चित्रपटासाठी व्हिजुअल इफेक्ट्स या तंत्राचा पोस्ट प्रोडक्शन म्हणून फार मोठा उपयोग केला जातो. महागडे चित्रपट आणि त्यांचा खर्च वाढण्याचे कारणच मुळात व्हिज्युअल इफेक्ट्स आहे. याची दोन उत्तम उदाहरणे म्हणजे अवतार आणि बाहुबली. जितक्या चांगल्या प्रमाणात व्हिज्युअल इफेक्ट्स चा वापर त्याप्रमाणात चित्रपटाच्या यशाची खात्री दिली जाते. त्यामुळे या क्षेत्रात करीयरच्या संधी फार मोठ्याप्रमाणात उपलब्ध होत आहेत. हे एक असे तंत्रज्ञान आहे कि जे कोणत्याही चित्रफिती वर निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात करावेच लागते. चित्रफितीत दाखविलेल्या दृश्यांची भव्यता हि केवळ पोस्ट प्रोडक्शन मधील या प्रक्रियेवर अवलंबून असते. या क्षेत्रात रोटो स्कोपी पासून कलर करेक्शन, वायर रिम्युव्हल, फायर इफेक्ट, वाटर इफेक्ट, कॅमेरा ट्रकिंग असे एक ना अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी आहेत कि ज्या खूप आकर्षित करणाऱ्या चित्रपट आणि जाहिरात क्षेत्राशी संबधित आहेत.
पडद्यावर तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या सर्वच गोष्टी व्हीएफएक्स मुळे सहज शक्य होतात. मोठाले भूकंप, पूर, डबल रोल, अग्नीकांड, निसर्ग सौंदर्य, धबधबे, अॅक्शन सीन असे सारे प्रसंग या तंत्रज्ञानाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अगदी साध्या डे नाईट सीन साठी देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. शिवाय चित्रपटाच्या एडिटिंग साठी याच प्रकारच्या साधनाचा वापर होत असतो. व्हिडीओ आणि साउंड एडिटिंग याचाच तर भाग आहेत.
भारतात उपलब्ध होणाऱ्या कुशल मनुष्यबळामुळे संपूर्ण जगाला या प्रकारच्या कामासाठी भारत सर्वोत्तम पर्याय वाटतो. यातूनच व्हीएफएक्स उद्योगाने गेल्या काही वर्षात जी वाढ करून दाखविली आहे ती प्रचंड मोठी आहे शिवाय हॉलीवूड चित्रपटाबरोबर आता बॉलीवूड चित्रपट हि व्हीएफएक्स चा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहे अजून पुढचा टप्पा प्रादेशिक चित्रपटांचा असून तो अजून शिल्लक असल्याने या क्षेत्रात आणखी भरपूर करियर चे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

वेब डिझायनिंग : माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ज्या प्रमाणे अनेक क्षेत्रात क्रांती झाली आहे त्याचे कारण मुळात माहिती चा साठा करू शकणे आणि तो सर्वांपर्यंत पोहचवणे या क्षमतेत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या यशात सर्वाधिक वाटा इंटरनेट चा आहे. माहिती गोळा करणे तिचे वितरण करणे या दृष्टीने इंटरनेट सोडून दुसरा पर्याय नाही. इंटरनेटच्या माध्यमातून माहिती सादर करण्याचे सर्वात महत्वाचे आणि एकमेव माध्यम म्हणजे वेब. वेब म्हणजे www अर्थातच वर्ल्ड वाईड वेब. वेब साठी आता आणखी एक पर्याय पुढे येतो आहे तो म्हणजे मोबाईल बेस app चा परंतु या या app साठी देखील वेब बेस सर्विस द्यावीच लागते.
मुळातच वेब हि संकल्पना माहितीच्या युगाच्या केंद्रस्थानी आहे. सामान्यपणे इंटरनेट आणि बेव हि संकल्पना आपणा सर्वांना एकच आहे असे वाटते. मुळात इंटरनेट हि एकमेकांशी टेलिफोन वायर किंवा वायरलेस पद्धतीने जोडलेल्या नेटवर्क चे एक जाले आहे तर वेब म्हणजे जागतिक स्तरावर केलेले माहितीचे संकलन आणि त्याचे प्रसारण करणारी व्यवस्था असे म्हणता येईल. ईमेल, ब्लॉग, फोरम, सोशल नेट्वर्किंग या सारख्या माध्यमातून जगभरात माहितीचे आदानप्रदान होत असताना वेब हाच एकमेव पर्याय आहे. आता कल्पना करा कि जर एक दिवस वेब बंद ठेवले किती मोठ्या प्रमाणात माहितीची  देवाणघेवाण होऊ शकणार नाही? जणू काही संपूर्ण जग एकाच ठिकाणी थांबले आहे अशी परिस्थिती निर्माण होईल.
जगाच्या दृष्टीने वेबसाईट हे सर्व प्रकारच्या कामाचे आणि व्यवहाराचे एक महत्वपूर्ण माध्यम आहे त्यामुळे आजमितीला इंटरनेट च्या माध्यमातून असंख्य किंवा मोजता येणार नाहीत इतक्या वेबसाईट सातत्याने प्रकाशित होत आहेत. शिवाय ज्या आधीच्या प्रकाशित आहेत त्यामध्येही सातत्याने नव्या माहितीचा भरणा होत आहे. नव्या वेबसाईट बनवणे आणि जुन्यामध्ये बदल करणे या कामासाठी वेब डिझायनर आणि वेब डेव्हलपर अश्या दोन वेगवेगळ्या कौशल्य प्राप्त असणाऱ्या कुशल मनुष्य बळाची गरज आहे.  या दोनही प्रकारच्या मनुष्य बळाला आज फार मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही आपल्याकडे डिझायनर म्हणजे करियर नाही या असलेल्या संकल्पनेमुळे फार मोठी खिळ बसलेली दिसून येते. तरी देखील उद्योग जगताचे आकडे मिळवले तर लक्षात येईल कि या उद्योगाने केवळ भारतात मागच्या वर्षी केलेली उलाढाल हि अंदाजे ४५ हजार कोटी रुपयांच्या घरात होती. म्हणजे यातल्या रोजगाराच्या संधी किती आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल.
या शिवाय या क्षेत्रात इतर प्रकारची कामे असतात. जसे कि सर्च इंजिन ओप्टीमायझेषन, सर्च इंजिन मनेजर, डिजिटल मार्केटिंग,यु आय डिझायनर, यु एक्स डेवलपर, फ्रंट एंड डेवलपर, कंटेंट डिझायनर आणि कंटेंट डेवेलपर. एकूणच वेब विश्वाचा पसारा इतका मोठा आहे कि तुम्हाला इथे करण्यासारखे भरपूर आहे आणि रोजगाराच्या तर प्रचंड संधी आहेत.
ग्राफिक्स डिझाईन : हजारो शब्द वापरून तुम्ही जे व्यक्त करू शकत नाही ते तुम्हाला एका ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगता येते. ग्राफिक्स डिझायनर हा काही केवळ चित्रे रेखाटणारा किंवा संगणकावर चित्रे काढणारा चित्रकार नसतो तर तो व्हिज्युअल संप्रेषणाचा तंत्रज्ञ देखील असतो. इथे कलात्मक दृष्टीकोनाबरोबर उत्तम तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागते. आपले ग्राफिक्स कोणत्या माध्यमात वापरायचे आहे त्याचे स्वरूप काय याचा विचार करून त्याचे तंत्र वापरावे लागते. अनेकदा ग्राफिक्सचा संबध चित्र आणि चित्रकलेशी जोडला जातो हे सत्य असले तरी संपूर्ण सत्य नाही. अनेक असे ग्राफिक्स डिझायनर आहेत ज्याचे कलात्मक किंवा चित्रकलेचे ज्ञान अत्यंत अल्प म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. तंत्राचा उत्तम वापर करून दृश्य साधन निर्माण करण्याची क्षमता आली कि वेगवेगळ्या संदर्भाच्या आधारे तुम्ही उत्तम ग्राफिक्स निर्माण करू शकता. केवळ चित्रकला चांगली नाही म्हणून तुम्हाला या क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्याचे काही एक कारण नाही.
साध्या फोटोला ग्राफिक्सच्या माध्यमातून आकर्षक करण्यापासून वर्तमानपत्रापर्यंत, मोडेलिंग उद्योगापासून फॅशन उद्योगापर्यंत, चांगल्या नोकरी पासुन कमी भांडवलात सुरु करता येईल अश्या स्वतःच्या व्यवसायापर्यंत सर्वच माध्यमातून तुम्ही एक ग्राफिक्स डिझायनर म्हणून चांगली सुरवात करू शकता. जाहिरात क्षेत्र तर ग्राफिक्स तंत्रज्ञानाच्या जीवावरच चालते. आजचे युग हे सादरीकरणाचे युग आहे. जो व्यक्ती स्वतःला किंवा स्वतःच्या उद्योगाला उत्तम प्रकारे सादर करतो त्यालाच त्याच्या क्षेत्रात उत्तम यशाची खात्री असते. या सादरीकरणासाठी ग्राफिक्स सोडून दुसरा पर्यायच नाही म्हणजे जगातल्या प्रत्येक उद्योगाला या ग्राफिक्स तंत्रज्ञानाची गरज आहे त्यातूनच ग्राफिक्स डिझायनर ची गरज हि अपरिहार्य आहे. अश्या सादरीकरनासाठी माध्यमेदेखील अनेक उपलब्ध आहेत.
कोणत्याही प्रिंट किंवा डिजिटल माध्यमातून प्रकाशित होणाऱ्या साधनाला ग्राफिक्स लागते. त्याची सुरवात अगदी त्याचा आराखडा तयार करण्यापासून होते. मग निर्मिती होताना रचना, रंग संगती, आकार, सादरीकरणाचे माध्यम या सर्वाचा विचार होतो. अगदी पत्रकापासून – वर्तमान पत्र –साप्ताहिके, नियतकालिके आणि वेब/डिजिटल बेस प्रेसेंटेशन पर्यंत सर्वच प्रसिद्धी माध्यमामध्ये ग्राफिक्स शिवाय पर्याय उरत नाही. पूर्वी ग्राफिक हे केवळ द्विमितीय असायचे आता ते त्रिमितीय स्वरुपात हि करता येते. दिवसेदिवस हे तंत्रज्ञान प्रगती आणि सुधारणा करत आहे. त्यातूनच करीयरच्या अनेक संधी या क्षेत्रात निर्माण होत आहेत आणि निर्माण होत राहतील.
इंटेरिअर डिझायनिंग : इंटेरिअर डिझाईन ही काही आपल्याला नवीन अशी संकल्पना नाही तरी देखील इंटेरिअर डिझाईन म्हणजे आपल्या सभोवतालची जागा आधिक रचनाबद्ध आणि सुशोभित करणारे शास्त्र. हो इथे मुद्दामच शास्त्र हा शब्द वापरला आहे कारण डिझाईन आहे तर शास्त्र कसे? हा प्रश्न प्रत्येकालाच पडू शकतो परंतु इंटेरिअर डिझाईन करताना अनेक प्रकारच्या शास्त्रांचा वापर करावा लागतो. सामान्यपणे इंटेरिअर डिझाईन म्हणजे आपले घर वा कार्यालय सुशोभित करणे एवढेच आपण समजतो ते केवळ तसे नसून सुशोभना बरोबर सुविधा पूर्ण आणि सुखदायक अशी राहण्याची वा काम करण्याची जागा तयार करणे होय. या क्षेत्राला आणखी जोड मिळते ती वास्तू शास्त्राची त्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घराचे-कार्यालयाचे सुशोभन हा आव्हानात्मक विषय एका इंटेरिअर डिझायनरलाच हाताळावा लागतो. गृहसजावटीच्या बरोबरच इलेक्ट्रिक, वाटर सप्लाय, फॉल्स सिलिंग, एअर कंडीशनिंग, फायर फायटिंग सिक्युरिटी अश्या  अनेक सुविधा आणि सेवांचा यामध्ये विचार करावा लागतो.
            एक इंटेरिअर डिझायनर उपलब्ध जागेची अधिक सोयी-सुविधायुक्त, सुबक, सुशोभित अश्या रीतीने वापर करण्यास योग्य रचना तयार करत असतो.  एका इंटेरिअर डिझायनर मध्ये सृजनशिलतेच्या जोडीला कौशल्याची, महत्वाकांक्षेची आणि  सौंदर्याच्या दृष्टीकोनाची जोड असणे गरजेचे असते. याशिवाय या क्षेत्रात नव्याने सेट डिझायनर, कम्प्युटर एडेड डिझायनर, प्रोडक्ट डिझायनर,  एलीवेशन डिझायनर अश्या नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्या या उद्योग क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य असलेल्या डिझायनर ची कमी आहे. त्यामुळेच या क्षेत्रात करीयर च्या उत्तम संधी उपलब्ध असून त्या भविष्यातही राहतील. या क्षेत्रात करियर चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कमी भांडवल गुंतवून तुम्ही तुमच्या घरातून देखील इंटेरिअर डिझाईन हा व्यवसाय सुरु करू शकता.

खात्री देणाऱ्या रोजगाराच्या संधी : भारतात डिझायनिंग क्षेत्रातल्या उद्योगाने फार मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून जगाच्या दृष्टीने भारतात असलेले मनुष्यबळ अधिक मोलाचे ठरत आहे कारण भारतीय मनुष्यबळाच्या आधारे काम केल्यास उत्पादन खर्च कमी होत शिवाय भारतीय मनुष्यबळ अधिक चांगले काम करू शकते.  त्यामुळे सतत येणारा कामाचा ओघ पाहता भारतात या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतील. या पार्श्वभूमीवर सृजन कॉलेज ऑफ डिझाईनच्या विविध अभ्यासक्रमातून गेल्या अकरा वर्षात विद्यार्थ्यांना करियरचा खात्रीलायक मार्ग सापडला आहे.
सृजनच्या उद्योग जगताची गरजेवर आधारित नियमित अद्ययावत होणारा अभ्यासक्रम, १००% विद्यार्थ्यांची गुणवत्ता जोपासणारी अभिनव शिक्षण पद्धती, राबविले जाणारे विविध उपक्रम, उद्योग जगतातील तज्ञांचे मार्गदर्शन, दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे दिले गेलेले वैयक्तिक लक्ष यासारख्या अनेक कारणांमुळे सृजनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची केवळ कौशल्य विकसित होत नाहीत तर उत्पादक क्षमता देखील विकसित होतात. एक उत्तम आर्टिस्ट-डिझायनर म्हणून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा येथे सर्वोतोपरी प्रयत्न केला जातो.
प्रमाणपत्र हे प्रत्येक शिक्षणानंतर शिक्षण पूर्ण केल्याचे त्याच बरोबर आपण प्राप्त केलेल्या गुणवत्तेचे प्रतिक असते. सृजन मध्ये तुम्हाला विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र मिळते तर इतर अभ्यासक्रमात संस्थेच्या प्रमाणपत्रासोबत अॅडोबी आणि अॅटोडेस्क यांच्या प्रोफेशनल प्रमाणपत्र परीक्षांना बसण्याची संधी देखील प्राप्त होते कारण सृजन या संस्थाचे अधिकृत परीक्षा केंद्र असून आपल्या विद्यार्थ्यांना सृजनच्या वतीने या परीक्षांना बसण्याची मोफत संधी दिली जाते.

No comments:

Post a Comment